Nagpur - Wardha Highway, Seloo
Maharashtra, India
Mobile: +91 9822836070, +91 9834609527
‘विद्यारंभ–२०२६’ विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेलू येथे नव्याने प्रवेशित इयत्ता ११ वी तसेच पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यारंभ–२०२६’ विद्यार्थी परिचय व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. ०९ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. राम पंचारिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयीन जीवनात ‘सहभाग आणि शिस्त’ या तत्त्वांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक उपक्रमांसोबतच विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील विविध सुविधा, शैक्षणिक संधी आणि महाविद्यालयाची वैशिष्ट्ये यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक श्री. निखिल वाघ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (MPSC 2020), आदिवासी विकास विभाग, वर्धा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वतःच्या MPSC परीक्षेतील यशाचा प्रवास सांगितला. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना सातत्य, योग्य नियोजन, आत्मविश्वास, शिस्त आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या संधींबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संयोजक डॉ. आशिष टिपले यांनी ‘विद्यारंभ–२०२६’ आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाची सुरुवात सकारात्मक दृष्टिकोनातून करावी, असे सांगितले.
डॉ. अभिजित पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विषयी माहिती दिली. डॉ. सिद्धार्थ नागदिवे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन शाखेची माहिती तसेच अभ्यासक्रम व शैक्षणिक संधी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. डॉ. गिरीश टापरे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील विविध अभ्यासक्रम व शैक्षणिक संधींचे सादरीकरण केले. डॉ. वैभव पिंपळे यांनी कला शाखेतील अभ्यासक्रम व शैक्षणिक संधी याबाबत मार्गदर्शन केले.
याशिवाय डॉ. शशांक निकम यांनी महाविद्यालयातील क्रीडा व विविध क्रीडा सुविधांची माहिती दिली. डॉ. वैशाली बडवाईक यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या Vermicomposting Project विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. शिल्पा मनकर यांनी आभार प्रदर्शन केले. श्री. देवा नाईक यांनी शिष्यवृत्ती योजना आणि त्यासंबंधीच्या प्रक्रियेबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘विद्यारंभ–२०२६’ या उपक्रमामुळे नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, अभ्यासक्रम, विविध सुविधा, उपक्रम, स्पर्धा परीक्षा, NSS, क्रीडा आणि शैक्षणिक संधी यांची सर्वंकष माहिती मिळाली. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाला आत्मविश्वासपूर्ण आणि प्रेरणादायी सुरुवात करून दिली.